खंत

श्री गणेशाय नमः

नमस्कार, 

मी अजित विनोद पंडीत आज पासून मी "नॅनोकथा" हे छोट्याश्या हलक्या फुलक्या कथांचे सदर सुरू करत आहे, आपण माझ्या अष्टागर पालघर ह्या ब्लॉगला खूप चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. नॅनोकथा ajittales.blogspot.com ह्या माझ्या ब्लॉगला आपण असाच प्रतिसाद द्याल याची मला खात्री आहे. चला तर आपण सुरूवात करूया आजच्या पहिल्या कथे पासून.


आजच्या कथेचे नाव आहे "खंत"

काहीवेळेस आपल्याला एखादी गोष्ट करायची खूप इच्छा असते मात्र परिस्थिती आपल्याला ते करू देत नाही. मनात असून देखील एखाद्याला आपण मदत करू शकत नाही, ह्यापेक्षा वाईट दुसरी गोष्ट नसावी.

सद्यस्थितीमध्ये आपण कोरोना महामारीला सामोरे जात आहोत या आजाराने अनेक गोष्टी बदलून गेल्या आहेत अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टी आपण करू शकत नाहीत. त्याच अनुषंगाने आजची कथा आहे.

अजय खूप चांगला आणि साधा युवक, सगळ्यांचे सगळे छान व्हावे ह्या मताचा. खूप काही नाही पण छोट्यामोठ्या मदती करायला त्याला आवडत असे. एकदा आपल्या चारचाकी वाहनातून भरदुपारी सरकारी कार्यालयातील ऑफिशियल काम आटोपून पुन्हा ऑफिस ला निघाला होता. मे महिना म्हणजे,  वैशाख वणवा पेटला होता 22 ते 25 किमी प्रवास होता म्हणून अजय ने एका ठिकाणी गाडी थांबवून चाकातील हवा चेक करत होता. त्या रणरणत्या उन्हात एक 16 ते 18 वर्षाचा मुलगा त्या रस्त्यावरून चालत येत त्याच्यापाशी येऊन थांबला. धाडस करून अजयला म्हणाला "मला पुढच्या गावी सोडाल का?"

खरंतर अजय तेथेच चालला होता आणि मदत करणं हे तर त्याचा आवडीचे काम. अजयच्या तोंडातुन हो निघणारच होते मात्र त्याच्या डोक्यात विचार आला कोरोनाच्या काळात मस्कविना ह्याला गाडीत कसे घ्यावे. त्या मुलास नकार देत मी इथेच शेजारील गावात जातोय असे म्हणूण वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आणि अजय गाडीत बसला. मात्र तो मुलगा गाडीच्या दारापाशीच उभा राहिला आणि म्हणाला जिथवर जाल तिथं सोडा असे म्हणत वि विनंती करू लागला.

त्या रणरणत्या उन्हात 22 ते 25 किमी प्रवास पायी करणे म्हणजे कठिण होतं, त्याची दया येत असूनही संभावित कोरोना संक्रमणाच्या भीतीने अजय पहिल्यांदा माणुसकी सोडून वागला होता. अजयला नाही म्हणवतही नव्हतं पण पुन्हा नकार देत तो मार्गस्थ झाला. डोक्यात विचारचक्र मात्र सुरूच, मी काहीच मदत करू शकलो नाही.

पुढे त्याच्या मनात आले की त्या मुलास आपण प्रवास करण्यासाठी पैसे तर नक्कीच देऊ शकलो असतो, पैशाअभावी तो पायी प्रवास करत असेल. पण हे मला आधी का नाही सुचले असा विचार करत तो स्वतःला दोष देऊ लागला, पण आता वेळ निघून गेली होती त्याचे ऑफिस समोर होते.

पुढील अनेक दिवस ही खंत त्याच्या मनात राहिली. खरच या आजारामूळे आपण किती असहाय्य आणि स्वार्थी झालोय नाही का?

कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

धन्यवाद,

Comments

  1. खरंच! ह्या कोरोना क्या काळात नकळत माणुसकी भितीपाई का होईना पण बाजूला सरली. पण त्याचसोबत उत्तम माणुसकीचे दर्शन सुद्धा बऱ्याच वेळा घडले.

    ReplyDelete
  2. खरच कीतीतरी वेळा आपण आपल्या मनात येत असुनही इतरांना मदत करू शकत नाही.

    ReplyDelete
  3. अगदि खरंय. आज काल या कोरोनाचा राक्षस इतका मोठा आहे की माणूस आणि त्यातली माणुसकी मुंगी इतकी पण दिसत नाही. खूप सुंदर कथा.
    पण खरं सांगू का आपण मदत करू शकलो नाही हि खंत त्याला वाटली हीच त्यातला माणूस आणि माणुसकी अजून जिवंत असल्याची खूण आहे.

    ReplyDelete
  4. अजित कथा खुप छ‌ान आहे. पण शेवट करतान‍ा त्यातून एक होकारार्थी विचार देण्य‍ाच‍‍ा प्रयत्न कर. म्हणजे तो हि एक कथेचाच भाग असला पाहिजे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद...आणि सूचना केल्याबद्दल आभार...पुढे सकारात्मक कथा नक्की वाचायला मिळतील.

      Delete
  5. Hari Om
    कथा छान वाटली ,शेवट positiv हवा होता पण अनोळखी माणसाला पैसे न देण्याचा विचार चंगला वाटला कारण त्या पैशाचा विनियोग कसा होईल हे आपल्याला कळणार नाही त्याचा विनियोग वाईट झालं तर त्याचे पाप आल्या डोक्यावर आदलाचे

    ReplyDelete
  6. खरे आहे. काही वेळा इच्छा असूनदेखील आपण मदत करू शकत नाही. कोरोनाने तर माणसामाणसामध्ये अगदी जवळच्या नातेवाईकांमध्ये देखील संशयाच्या भिंती उभ्या केल्या आहेत. ज्याप्रमाणे दान सत्पात्री द्यावे तसेच केलेली मदत पण खऱ्या गरजवंताला मिळते की नाही अशी साशंकता मनात असेल तर आपण हात आखडता घेतो. या कथेतील नायकाप्रमाणे वाईट वाटणे साहजिक आहे. पण अनेकदा असे होते.
    बाकी कथा खूपच छान, अंतर्मुख करायला लावणारी. 👍👍👍

    ReplyDelete
  7. खर आहे.माणुसकी संपलीअसे नाही तर या आजाराची भिती जास्त आहे म्हणून असे घडते.
    कथा खूप छान आहे.

    ReplyDelete

Post a Comment